Saturday, August 20, 2011

आधी बदल आपल्यात.. नंतर आंदोलने..

देशभर उसळलेले अण्णांचे आंदोलन, कार्यकर्त्यांची उपोषणं या आत्ताच्या उफाळलेल्या विषयांवर परवा दुपारी ऑफिसमधे चर्चा चालू होती. बालगंधर्व चौकात ऑफिसनंतर कोण कधी जाणार यावर सगळे बोलत होते. बोलता बोलता प्रत्येकाचे या धर्तीवरचे विचार समोर येत होते. पण त्यात शर्वरी एका विषयावर घवघवून बोलली. आपल्याप्रमाणे अजून कोणीतरी हा विचार करतं ऐकून मला मनोमन बरे वाटले. आधी कधीच या विषयावर लिहिले नाही पण आज गरज आहे कोणीतरी हे बोलायची, किंवा प्रत्यक्षात अमलात आणण्याची.

एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आज जनता सरकार विरोधात उभी ठाकली आहे. आजचा लढा भ्रष्टाचार विरुद्ध असला तरी त्यात आपण सामील व्हायला कितपत योग्य ठरतो हा देखील विचार करणे गरजेचे ठरते. दुसऱ्यावर बोट दाखवणे सोपे असते असं सगळेच म्हणतात. एवढ्या मोठ्या संख्येने आज एक लढाई लढली जात आहे. एक चांगला मोठा बदल घडवून आणण्याआधी दिवसातल्या ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी डावचून आपण पुढे जातो प्रथम त्यात सुधारणा आणणे आपले कर्तव्य आहे. सरकारच्या भ्रष्ट वागणुकीच्या विरोधात जाण्यापूर्वी त्याच सरकारने आपल्यासाठी जे नियम केले आहेत ते आपण कितपत पाळतो याची दखल जरी प्रत्येकाने घेतली तरी खूप आहे.

कित्येक साध्या साध्या गोष्टी. सिग्नल हिरवा झाला की पुढे जावे आणि लाल झाला की थांबावे हे इयत्ता पहिलीत शिकवून पण इतक्या वर्षानंतर गाडी पुढे कधी काढली जाते काळत नाही. पादचारी सिग्नल लाल असतानादेखील भरधाव येणाऱ्या गाड्यांसमोर रस्ता पार करणे आणि वर त्यांच्यावर ओरडण्यात काय अर्थ आहे. दुभाजकाचा उपयोग ट्राफिक जास्त असताना त्याच्या दुसऱ्या बाजूने गाडी सगळ्यांच्या पुढे काढण्यासाठी असतो की काय?  त्याच वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांना आपल्यामुळे पुढे जाता येणार नाही आणि सगळाच ट्राफिकचा खोळंबा होईल हे स्वतःहून कधी उमगणार?

सणवारांना, नेत्यांच्या जयंत्याना मोठमोठे स्पीकर लावून बेधुंद नाचून, मिरवणुकीतून ट्राफिक अडकवून, आवाजाचे प्रदूषण करण्यात काय मजा आहे? गरज नाही तिथे मोठमोठ्याने हॉर्न वाजवून, अतिवेगाने गाड्या हाकण्यातली मस्ती त्यांच्या नाही पण एखाद्याच्या जीवावर बेतू शकते हा समंजसपणा कधी येणार. आजकाल जो नियम पाळत गाडी चालवतो तोच ठोकला जातो असे माझे स्पष्ट मत आहे. दिमाखदार गाड्यातून फिरणाऱ्या लोकांना खिडकीतून बाहेर कचरा टाकणे, सिगरेट फेकणे यात काय मोठेपणा गाजवायचा असतो? वर शांतपणे कधी ह्यांना सांगायला गेला तर फुकटचे उपदेश केल्या सारखं दुर्लक्ष केलं जातं. चुकून सिगरेटची एखादी राखेचा कण मागच्याच्या नाकाडोळ्यात गेला तर चेकने नुकसान हे लोक भरणार का..!!

गाड्यांना सामान, पर्स ठेवण्यासाठी शिस्तीत जागा दिली असताना त्या खांद्यावर लटकवून भर ट्राफिकमधे चोरांना आमंत्रणे आपण बायकांनीच द्यायची आणि नंतर ती पळवून नेली की आरडाओरडा देखील आपणच करायचा.. बस, रेल्वे मधे खिडकीबाहेर कचरा टाकू नका सांगितला तर दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर फेकणारे लोक पण कित्येक बघितले. गाडीत खाली ठेवला तर काय बिघडला. गाडी रोज तरी स्वच्छ होते, बाहेरचा निसर्ग स्वच्छ करणारे कोणी पाहिलेत का. पेट्रोल ऑईल घेताना ५०-५० पैशाने पण नफा कमवणारे कामगार तो पैसा आपल्या खिशात घालतात आणि आपण बिल न घेता तो सरकारच्या म्हणजेच आपल्याच tax मधून आलेल्या शेवटीच आपलाच पैसा सहज त्यांच्या हवाली करतो.

मोठमोठ्या जाहिरातींचे, नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावायला सिग्नलच्या समोरची जागा मिळावी की सिग्नलच दिसू नये? निरनिराळे चौकात पुतळे बांधण्यापेक्षा त्याच पैशांचा अजून चांगल्या अर्थाने वापर होऊ शकतो. रात्री जाहिरातींवरचा झगमगाट थोडा कमी झाला, आपल्या घरातले साधे वाशिंग मशीन एक दिवसाआड लावले तरी कित्ये किलोवॅट वीज वाचेल. दुकानात प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे तरी जास्तीचे ५ रुपये भरून ती घ्यायला लोक तयार असतात. प्रथम आपण आपली न्यायला काय वजन पडतं आणि आपण जास्त पैसे भरतोय तर मग ती recycle करता यावी हा अट्टाहास का नसावा? एक-दोन रुपयांच्या सुट्ट्या नाण्यासाठी भांडण्यात काय अर्थ आहे. कॉम्पुटरवर काम झालं की स्क्रीन बंद केला तर काही बिघडत नाही. लहान तोंडी मोठा घास घेऊन मोठ्यांना या गोष्टी सांगितल्या तर त्या चांगल्या आहेत तरी पटत का नाही याचे नवल वाटते. मागच्या आणि आत्ताच्या पिढीच्या चुकांमुळे आपली पुढची पिढी त्रासात जगणारे जाची जाणीव सगळ्यांना कधी होणार?

अशा कित्येक साध्यासुध्या गोष्टी आहेत. आपण त्या बदलायच्या की नाही हा विचार स्वतःपासून सुरु करू शकतो. "Its a common human tendency to follow the least resistance." असे एकदा आमचे प्रोफेसर humanity च्या लेक्चरला बोलून गेले होते. पण एक मोठा बदल धडवून आणण्याच्या आंदोलनाआधी तो बदल स्वतःत घडवून आणण्याचा निर्णय प्रथम घेतला गेला पाहिजे. मग नंतर येतात सामाजिक  लढे. शेवटी नेते पण आपल्यातलेच एक निवडून आले आहेत. तेव्हा मित्रहो आज सरकार विरुद्ध जाताना एकदा रात्री झोपण्याआधी ५ मिनिटे तरी याचा देखील जरूर विचार करून बघा.....!!

3 comments:

sharayu said...

अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आपला भ्रष्टाचारी भूतकाळ पुसून टाकता येईल या कल्पनेने अण्णाना पाठिंबा दिला जात आहे.

सायली चौधरी said...

शरयू, अण्णांच्या आंदोलनाच्या विरुद्ध ह्या लेखाचा विषय नाही, आपल्या मनोवृत्तीचा आहे. आंदोलन झाल्यावर होणाऱ्या सामाजिक बदलामध्ये ह्या गोष्टी सुधा गरजेच्या आहेत, तरच आपण एक सुधारित राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ. अन्यथा परत सगळे पाण्यातच जाईल आणि २० वर्षांनी दुसरे अण्णा उभे राहण्याची वेळ येईल.

ओजस चौधरी said...

तुझा पोईंट एकदम बरोबर आहे....आपल्या घरापासून आधी सुरवात करून मग पुढे जायला पाहिजे...मला तर या विषयावर बोल्याचा खरा काही हक्क नाही कारण मी पोलिसाला लाच खूप वेळा दिली आहे...पण माझ्या मते १५०-२०० रुपये पोलिसाने खाल्ले तरी परवडतात कारण ती त्याची मजबुरी आहे...पण गरजेपेक्षा भूक वाढली की चूक आहे...आणि तिकडे हे सगळे राजकारंनी येतात..त्यांना शिक्षा झाली की देश तरी वाचेल आणि थोडी तरी सुबत्ता येईल आणि सामान्य लाच खोरी बंद होयेल..