Saturday, August 20, 2011

आधी बदल आपल्यात.. नंतर आंदोलने..

देशभर उसळलेले अण्णांचे आंदोलन, कार्यकर्त्यांची उपोषणं या आत्ताच्या उफाळलेल्या विषयांवर परवा दुपारी ऑफिसमधे चर्चा चालू होती. बालगंधर्व चौकात ऑफिसनंतर कोण कधी जाणार यावर सगळे बोलत होते. बोलता बोलता प्रत्येकाचे या धर्तीवरचे विचार समोर येत होते. पण त्यात शर्वरी एका विषयावर घवघवून बोलली. आपल्याप्रमाणे अजून कोणीतरी हा विचार करतं ऐकून मला मनोमन बरे वाटले. आधी कधीच या विषयावर लिहिले नाही पण आज गरज आहे कोणीतरी हे बोलायची, किंवा प्रत्यक्षात अमलात आणण्याची.

एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आज जनता सरकार विरोधात उभी ठाकली आहे. आजचा लढा भ्रष्टाचार विरुद्ध असला तरी त्यात आपण सामील व्हायला कितपत योग्य ठरतो हा देखील विचार करणे गरजेचे ठरते. दुसऱ्यावर बोट दाखवणे सोपे असते असं सगळेच म्हणतात. एवढ्या मोठ्या संख्येने आज एक लढाई लढली जात आहे. एक चांगला मोठा बदल घडवून आणण्याआधी दिवसातल्या ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी डावचून आपण पुढे जातो प्रथम त्यात सुधारणा आणणे आपले कर्तव्य आहे. सरकारच्या भ्रष्ट वागणुकीच्या विरोधात जाण्यापूर्वी त्याच सरकारने आपल्यासाठी जे नियम केले आहेत ते आपण कितपत पाळतो याची दखल जरी प्रत्येकाने घेतली तरी खूप आहे.

कित्येक साध्या साध्या गोष्टी. सिग्नल हिरवा झाला की पुढे जावे आणि लाल झाला की थांबावे हे इयत्ता पहिलीत शिकवून पण इतक्या वर्षानंतर गाडी पुढे कधी काढली जाते काळत नाही. पादचारी सिग्नल लाल असतानादेखील भरधाव येणाऱ्या गाड्यांसमोर रस्ता पार करणे आणि वर त्यांच्यावर ओरडण्यात काय अर्थ आहे. दुभाजकाचा उपयोग ट्राफिक जास्त असताना त्याच्या दुसऱ्या बाजूने गाडी सगळ्यांच्या पुढे काढण्यासाठी असतो की काय?  त्याच वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांना आपल्यामुळे पुढे जाता येणार नाही आणि सगळाच ट्राफिकचा खोळंबा होईल हे स्वतःहून कधी उमगणार?

सणवारांना, नेत्यांच्या जयंत्याना मोठमोठे स्पीकर लावून बेधुंद नाचून, मिरवणुकीतून ट्राफिक अडकवून, आवाजाचे प्रदूषण करण्यात काय मजा आहे? गरज नाही तिथे मोठमोठ्याने हॉर्न वाजवून, अतिवेगाने गाड्या हाकण्यातली मस्ती त्यांच्या नाही पण एखाद्याच्या जीवावर बेतू शकते हा समंजसपणा कधी येणार. आजकाल जो नियम पाळत गाडी चालवतो तोच ठोकला जातो असे माझे स्पष्ट मत आहे. दिमाखदार गाड्यातून फिरणाऱ्या लोकांना खिडकीतून बाहेर कचरा टाकणे, सिगरेट फेकणे यात काय मोठेपणा गाजवायचा असतो? वर शांतपणे कधी ह्यांना सांगायला गेला तर फुकटचे उपदेश केल्या सारखं दुर्लक्ष केलं जातं. चुकून सिगरेटची एखादी राखेचा कण मागच्याच्या नाकाडोळ्यात गेला तर चेकने नुकसान हे लोक भरणार का..!!

गाड्यांना सामान, पर्स ठेवण्यासाठी शिस्तीत जागा दिली असताना त्या खांद्यावर लटकवून भर ट्राफिकमधे चोरांना आमंत्रणे आपण बायकांनीच द्यायची आणि नंतर ती पळवून नेली की आरडाओरडा देखील आपणच करायचा.. बस, रेल्वे मधे खिडकीबाहेर कचरा टाकू नका सांगितला तर दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर फेकणारे लोक पण कित्येक बघितले. गाडीत खाली ठेवला तर काय बिघडला. गाडी रोज तरी स्वच्छ होते, बाहेरचा निसर्ग स्वच्छ करणारे कोणी पाहिलेत का. पेट्रोल ऑईल घेताना ५०-५० पैशाने पण नफा कमवणारे कामगार तो पैसा आपल्या खिशात घालतात आणि आपण बिल न घेता तो सरकारच्या म्हणजेच आपल्याच tax मधून आलेल्या शेवटीच आपलाच पैसा सहज त्यांच्या हवाली करतो.

मोठमोठ्या जाहिरातींचे, नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावायला सिग्नलच्या समोरची जागा मिळावी की सिग्नलच दिसू नये? निरनिराळे चौकात पुतळे बांधण्यापेक्षा त्याच पैशांचा अजून चांगल्या अर्थाने वापर होऊ शकतो. रात्री जाहिरातींवरचा झगमगाट थोडा कमी झाला, आपल्या घरातले साधे वाशिंग मशीन एक दिवसाआड लावले तरी कित्ये किलोवॅट वीज वाचेल. दुकानात प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे तरी जास्तीचे ५ रुपये भरून ती घ्यायला लोक तयार असतात. प्रथम आपण आपली न्यायला काय वजन पडतं आणि आपण जास्त पैसे भरतोय तर मग ती recycle करता यावी हा अट्टाहास का नसावा? एक-दोन रुपयांच्या सुट्ट्या नाण्यासाठी भांडण्यात काय अर्थ आहे. कॉम्पुटरवर काम झालं की स्क्रीन बंद केला तर काही बिघडत नाही. लहान तोंडी मोठा घास घेऊन मोठ्यांना या गोष्टी सांगितल्या तर त्या चांगल्या आहेत तरी पटत का नाही याचे नवल वाटते. मागच्या आणि आत्ताच्या पिढीच्या चुकांमुळे आपली पुढची पिढी त्रासात जगणारे जाची जाणीव सगळ्यांना कधी होणार?

अशा कित्येक साध्यासुध्या गोष्टी आहेत. आपण त्या बदलायच्या की नाही हा विचार स्वतःपासून सुरु करू शकतो. "Its a common human tendency to follow the least resistance." असे एकदा आमचे प्रोफेसर humanity च्या लेक्चरला बोलून गेले होते. पण एक मोठा बदल धडवून आणण्याच्या आंदोलनाआधी तो बदल स्वतःत घडवून आणण्याचा निर्णय प्रथम घेतला गेला पाहिजे. मग नंतर येतात सामाजिक  लढे. शेवटी नेते पण आपल्यातलेच एक निवडून आले आहेत. तेव्हा मित्रहो आज सरकार विरुद्ध जाताना एकदा रात्री झोपण्याआधी ५ मिनिटे तरी याचा देखील जरूर विचार करून बघा.....!!

Tuesday, August 16, 2011

Cokestudio.pkशनिवारी सहज जेजेतल्या एका मित्राशी बोलताना विषय निघाला कोकस्टुडीओचा.. आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या एका खूप जुन्या मित्राने सहज ऑनलाइन या प्रोग्रामबद्दल सांगितले होते. प्रथम एक लिंक देऊन नंतर थोडी फार माहिती सांगितली. त्या एका गाण्याने एवढे वेड लावले दुसऱ्या दिवशी कॉलेजनंतर २ तासात सगळे एपिसोड्स डाउनलोड केले आणि एका आठवड्यात behind the scenes सकट सगळे बघून झाले होते.

कोकस्टुडीओ खरं तर पाकिस्तानी सिरीज आहे. क्लासिकल पासून कंटेंपररी पर्यंत नवोदित व रुजलेल्या कलाकारांना घेऊन रेकॉर्ड केलेले लाइव्ह फ्युजन सेशन्स. सुरवातीला टीव्ही आणि रेडियोवर प्रसारण व्हायचे. हळू हळू लोकप्रियता वाढली तसे वेबसाईट http://www.cokestudio.com.pk/ , फेसबुक, युट्युबवर जगभर सर्वांना बघण्यास उपलब्ध झाले. वेबसाईट वर सगळ्या एपिसोड्सचे ऑडिओ, विडीओ आणि behind the scenes(BTS) बघायला मिळतात. BTS बघितल्याने त्या गाण्यावर काय नाविन्य आणि मेहनत घेतली आहे अशा प्रत्येक detail कडे लक्ष जायचे. 2008 पासून सुरु झालेला हा प्रोग्राम दिवसेंदिवस अधिकाधिक श्रोते खेचतो आहे. लाल, काळा, पांढरा अशा bright रंगातला सेट पहिल्या झटक्यात लक्ष वेधून घेतो. band मधले सगळे artist उत्तमोत्तम वाजवण्याचा प्रयत्न करतात. आत्तापर्यंत कोकस्टुडीओ (पाकिस्तान)चे चार सिझन्सचे शुटींग झाले आहे. पहिले तीनही एपिसोड्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत. चौथा आत्ताच आल्याने हळू हळू येईल.

पाकिस्तानी संगीत आपल्या अरेबिअन, अफगाणी पासून राजस्थानी हद्दीजावालच्या संस्कृतीची छाप मनावर सोडून जाते. झेब आणि हानीया या दोन मुली कमाल करतात. हिंदी पेक्षा त्यांची अफगाणी व अरेबिअन गाणी 'बीबी सनम जानम, अनार सिस्तानम् (My love, you are like the sweet pomegranate of Sistan) http://www.youtube.com/watch?v=kksSpCqM1No&feature=related, पैमोना बिदे की खुमार अस्तान (Bring me the glass so I may lose myself)'  http://www.youtube.com/watch?v=QTzHJH1iv30पहिल्यांदा भाषा कळली नाही तरी परत परत ऐकावीशी वाटतात. नझार आईले नझार आईले, गिल यानामा पाझार आईले (Look at me… Look at me… Gather around and we will make it a lively bazaar ) http://www.youtube.com/watch?v=yvLv2-A0mnc गिटारने केलेली सुरवात आणि इतर गाण्यांहून पूर्ण वेगळे असे '5 beats' चे तुर्की गाणे, instruments वर समजायला अवघड पण तेवढेच कायम गुणगुणावेसे वाटते. त्यांचे जावेद बाशीर बरोबरचे पूर्णतः क्लासिकल 'चल दिये' http://www.youtube.com/watch?v=Zz78R2rCOvE&feature=related गाण्याचे बोल आणि मांडणी प्रेमात पडलेल्याला परत प्रेमात पाडेल.

फ्युजन चा कळस म्हणजे नुरी ब्रदर्स. सतार आणि रॉकचे अफलातून जादू ऐकायला मिळते 'किदारhttp://www.youtube.com/watch?v=HYlFzD5MCrI आणि 'सारी रात' http://www.youtube.com/watch?v=-S5U2GXKBSo गाण्यात..! दोन्हीमध्ये गम्बी याने जीव खाऊन ड्रमसेट बेक्कार बडवला आहे. आणि याच्या उलट एकदम शांत स्वरूपाचे 'होर वी निवान होhttp://www.youtube.com/watch?v=qUcaCYx0kzI&feature=related गाणं हे भाऊ आई वडिलांबरोबर सादर करतात ते पण तेवढंच उच्च..
राहत फतेह अली खान क्लासिकल 'गरज बरसhttp://www.youtube.com/watch?v=2iTDaBXsLhM&feature=related चालू करतो आणि अली अझमत पुढे भाव खाऊन जातो. strings आपली नेहमीची गाणी सादर करून शांत बसले आहेत पण त्यात देखील 'सरकिये, तीतलीया, झिंदा' मस्त जमली आहेत. अबिदा परवीनचे 'रमुझ-ए-इश्क़ (में हू माशहूर)'  ऐकल्यावर एका वेगळ्याच विश्वात पोचल्यासारखे वाटते. सारेगामापा विनर अमानत अली इंग्लिश मधले 'आयेशाhttp://www.youtube.com/watch?v=iJJYdY-9U-w&feature=related हिंदीत सुरेख सादर करतो. त्याच्या घोगऱ्या आवाजातले 'ए वतन के सजीले जवानोhttp://www.youtube.com/watch?v=VXQzzJZXcYc सरळ काळजात घुसते. आतिफ अस्लमचे 'जल परी http://www.youtube.com/watch?v=zmLp3PC71vE&feature=related आणि किनारा' http://www.youtube.com/watch?v=TXGTA3X99g0 आत्तापर्यंत त्याचे best performance असतील.

या सगळ्यात मनाला भिडणारा आवाज म्हणजे शिफाकत अमानत अलीचा. 'आखोके सागरhttp://www.youtube.com/watch?v=I7xqX51zqoM&feature=related आणि 'खमाज' http://www.youtube.com/watch?v=uMF8npZN5wE&feature=related ऐकताना आपोआप डोळे बंद होतात. ओरीजीनल ऐकावेसे वाटत नाही इतका सुरेख मेकओव्हर एखाद्या गाण्याचा पहिल्यांदाच ऐकायला मिळाला.

'नैना दे आंखे लग गये, रोना छोड दिया, इक आलीफ, कुछ अजब खेल, जो मेरे, चूप' अशी अजून कित्येक गाणी कोकस्टुडीओ गाजवतात. ही लोकप्रियता बघून Mtv ने कोकस्टुडीओ भारतात आणले. आपल्या वेगवेगळ्या भाषा, त्यांच्या निरनिराळ्या शैलीतली गाणी आणि यात फुजन तर अजून विविधता आणेल..हळू हळू आपल्या नवनवीन आणि दिग्गज कलाकारांना ऐकायची संधी मिळणार आहे आणि नेहमीप्रमाणे कोकस्टुडीओ आपल्या मैफिली अशाच रंगवत राहील हे नक्कीच..

Monday, June 13, 2011

गंधर्व .. !!

महिन्याच्या दुसऱ्या शनिवार-रविवारची मला सुट्टी असल्याने आज बाबांनी देखील रजा घेतली. सकाळी उठल्यावर गप्पांमध्ये दिवसाचे आराखडे होता होता एक महिना झाला  घरच्यांबरोबर बघायचा ठरवलेला "बालगंधर्व" सिनेमाला जायचं ठरलं. गरम मिसळ आणि दुपारच्या पडीनंतर ५.३० च्या खेळाची तिकीटे काढली. आम्ही बरेच आधी पोचल्यामुळे आमच्या गप्पांमधून पण लोकांच्या गप्पांकडे लक्ष जात होतं. अगदी " family movie" आहे हो, बघितलाच पाहिजे असे म्हणत बरेच तिथे जमले होते.

बाबा मुळात कलाप्रेमी असल्याने मी विषयाशी पूर्णपणे परिचित होते. इतके दिवस जेव्हा कधी विषय निघायचा तेव्हा बाबा भरभरून बोलायचे. त्यांना कुठे थांबवायचे का नाहीच असा प्रश्न आई आणि मला पडायचा. त्यांच्या डोळ्यात चमकणाऱ्या त्या कलाप्रेमाने त्या बोलण्याला अजून उठाव यायचा. घरातल्या ३०० हून अधिक संगीताच्या कॅसेट्स व त्याहून कित्येक अधिक पुस्तके वाचून जमलेला तो ठेवा मला ते देऊ पाहतात. खोलवर अभ्यास नसला तरी चालेल पण अंगातलं रसिकत्व जप असं नेहमीच ते सांगत आले. रक्ताने जोडलेले आम्ही, ही शिकवण मुरायला जास्त वेळ लागला नाही. थोडेफार गाता व synthesizer वाजवता येते पण त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा मानस राहिला तो राहिलाच.

आजच्या reality shows मध्ये उठलेला कलेचा बाजार बघता मनोमन चीड येते. पण संसार चालवायचा म्हणजे लागणारा पैसा मिळवण्याचे तो एकमेव पर्याय उरल्यासारखे वाटते. डोक्याला निर्मळ आनंद देण्यापेक्षा कलकलच जास्त होते. अशावेळी आपले संपूर्ण आयुष्य रसिकांसाठी वाहून घेणाऱ्या गंधर्वांची महानता कळते की आदर वाटतो नीट समजत नाही.  भामिनीचा खानदानीपणा जपण्यासाठी तडफडणाऱ्या त्या जिवाच्या गोष्टी ऐकताना व आज सिनेमात समोर बघताना ते कलेवरचे वेडे प्रेम बघून अंगावर काटा आला. त्या वेळचे पुणे, कोल्हापूर, तो रंगमंच जणू त्या पडद्याऐवजी उभा केला होता.

दोन तास नेत्रसुख आणि भावना यात गुरफटलेल्या अवस्थेतच आम्ही स्तब्ध होतो. थिएटर बाहेर पडता पडता लोकांच्या टिपण्या परत लक्ष वेधून घ्यायला लागल्या. "काय कॅमेरा वापरलाय हो, सुबोधने काय झकास काम केलंय, मध्यंतरानंतर जरा रडवेला होता, यंदा सगळे अवार्ड सुबोध नेणार नक्की." सिनेमाच्या शेवटच्या ओळी संपायच्या  आधीच बाहेर चालू लागणाऱ्या ठकांची चीड येत होती. आम्ही २०-३० जण अजून ते जुने फोटो बघत असताना देखील ह्यांची बडबड सुरूच. हा सिनेमा केवळ एक entertainment आहे ह्यासाठी किती लोक आले होते आणि किती खरंच गंधर्वांच्या आयुष्यनाट्यात सामील व्हायला आले होते कुणास ठाऊक. सिनेमाचा पूर्ण वेळ बाजूला वेफर्स खाणारी मुले व पुढे ऑफिसमधल्या गप्पा मारणाऱ्या त्या बापाला ओरडून सांगावेसे वाटले घरी जाऊन काय ते टाळ पिटा !

घरच्यांना असलेल्या ज्ञानामुळे व रसिकत्वामुळे ह्या चित्रपटाची खोली मला जाणवू शकली. लहानपणापासून ह्या गोष्टी कानावर पडल्याने हा ठेवा ५०% का होईना मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकते. सिनेमात केवळ एक व्यक्तिरेखा साकारून सुबोधवर नकळत कलेने कित्येक संस्कार रुजवले असतील. त्यावर तो आपले पुढचे जीवन सार्थकी लावेलाच यात शंका नाही. पण मनात विचार येतात. त्या वेफर्स खाणाऱ्या मुलाला काय कळला असेल हा चित्रपट? ऑफिसच्या गप्पात बुडालेल्या त्या आईवडलांना सिनेमाची खोलाई जाणवत नाही तर त्या पुढच्या पिढीला कुठून उमगणार. कलेचा होणारं ऱ्हास तो हाच का नकळत वाटून गेले. विद्या आणि कलेचे माहेरघर अजून किती दिवस हे जपू शकणार हा प्रश्न आहे.

घरच्यांमुळे रुजलेले रसिकत्व आज कुठे तरी सुन्न झाले. ज्या बालगंधर्वांच्या सिनेमाचा आज गाजावाजा चालला आहे त्यांचे पुण्यातले अर्धवट पडके घर अजूनही कसाबसा हा पावसाळा झेलू पाहते आहे याचे वाईट वाटते...

Friday, June 3, 2011

पाऊस असा रुणझुणता..

पाऊस काय सुरु झाला फेसबुक वर स्टेटस अपडेट करायला लोकांना अगदी ऊत आला.. मी पण काय त्यात कोणी वेगळी नाही. फरक फेसबुक ऐवजी फक्त ब्लॉगचा आहे. गेले काही दिवस लिहायला वेळ झाला नाही. पण आज थोडसंच का होईना पण लिहण्यावाचून राहवलं नाही.

साडेचार वर्षानंतर आज पुण्यातला पाउस अनुभवतेय. साईट वर जाताना सर बोलून गेले आज पाऊस पडणार. रणरणत्या उन्हात पुणे विद्यापीठाची मंडळी आमचं काम बघायला साईटवर येणार होती. सगळं नीट पार पडलं तसे मी आणि सर ऑफिस कडे परत निघालो. तोपर्यंत ढगांनी आपले रंग बदलले होते. त्यात पाषाण रस्त्याने स्वतःचा एक नवीनच कॅनवास रंगवला होता. दोन्ही बाजूने गुलमोहोर बहरला होता. त्यात मधे मधे बोगनवेल आपल्या गुलाबी पांढऱ्या छटांमध्ये खुलून दिसत होती.

चांदणी चौक पार केला तसं समोर कोथरूड वर उठलेलं धुळीचं वावटळ दिसलं. सरांनी गाडीचा वेग वाढवला. गाडीत दोन प्रोजेक्टची कागदाची मॉडेल असल्याने त्यांना पावसापासून वाचवणं जास्त महत्वाचं होतं. गाडी ऑफिसखाली आली तसे पटापट आम्ही मॉडेल खाली उतरवले आणि लिफ्ट कडे धाव घेतली. गाडी पार्किंग मधे घातली तेवढ्यात वरचं झाड कोसळलं. पण आमची धावपळ कामी आली. आत पाऊल ठेवलं आणि समोर सगळे कागद भिरभिर उडत होते आणि खिडक्या लावायला सगळे पळत होते. गरम चहाची ऑर्डर सोडली. नंतर ओघानेच सगळी पावसाची गाणी सगळ्यांनी लावली. गप्पा सुरु झाल्या.

आपापल्या कॉलेजच्या आठवणीत सगळे रमून गेले. पहिल्या पावसाच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कथा. कोणी सिंहगड तर कोणी लवासा, कोणी मरीन ड्राईव्ह तर कोणी खडकवासला.  गरम गरम भजी असो वा जिलबी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी.. चिखलात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच. काहीना दुरवर भटकून येण्याची आवड तर काहीना गच्चीवर जाऊन बसण्याची आवड.

कधीतरी साचलेल्या पाण्यापासून गाडी वाचवत स्वतःला सांभाळणारे लोक तर कुठे त्याच पाण्यात उड्या मारणारी बच्चे कंपनी. चिखलातून पाय खाली न टेकवता सरळ गाडी पुढे काढायची कसरत तर कुठे दुसऱ्यावर सुर्रकन पाणी उडवून जाणारया ४ व्हीलर्स. चप्पल कमी नक्षीकाम करेल पण बाईकवाल्यांचे मागचे टायर अफाट कारंज उभे करेल.

मान्सून ट्रेकचे प्लान्स आजकाल ठरवायला लागत नाहीत. गाडी काढून मुळशी गाठायला कोणी मागेपुढे पाहत नाही. कितीही दरड कोसळली तरी माळशेज आपला दुधसागरने सर्वांना बोलावतच राहतो. कोकण रेल्वेचा प्रवास फक्त निसर्गदर्शनासाठी केला जातो. कितीही उसळल्या लाटा तरी समुद्राकडे जाववून राहवत नाही.

पावसाकडे शून्यात बघत जुन्या आठवणी ताज्या होतात. पाऊस असा रुणझुणता.. सलीलचे गाणे साद घालते.. हिंदी मराठी इंग्लिश सगळी पावसाची romantic गाणी playlist मधे आपली जागा बनवतात.

आणि यात ऐन पावसात महानगरपालिका रस्त्यांची कामं काढणार. परत आता रस्त्यावर खड्डे वाढणार, चिखलात चाक फसणार, विजा कडकडणार,झाडं पडून खांब पडणार, तासन तास लाईट जाणार, कामाच्या वेळी धो धो वरुणराजे कोसळणार, रेनकोटची बटनं टिकणार नाही, ओल्या कपड्यांमधेच काम करायला लागणार, गाडीचे ब्रेक तर लागणारच नाही, पाणी साचून वाहतूक ठप्प होणार.. सरासरीपेक्षा कमीजास्त पाऊस पडणार, हवामानखात्याचे अंदाज नेहमीच चुकणार, कुठे पूर तर कुठे कृत्रिम पाऊस, चिकचिक कधी संपणार नाही.

वर्षोनुवर्षे चालणारे तेच कधीही न बदलणारे चित्र, कितीही वेळा रंगवले तरी बदलणार नाही..

Friday, May 6, 2011

द "होस्टेल" पार्ट ऑफ लाईफ....!!

बऱ्याच दिवसाने लिहितेय आज. एप्रिल महिना, शेवटची परीक्षा झाली, होस्टेलची रूम रिकामी करायला ३० एप्रिल पर्यंत मुदत दिली. पण परीक्षा होऊन २० दिवस झाले तरी शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यात होस्टेल सोडायची हिम्मत नव्हती. मरीन ड्राईव्ह सोडवत नव्हता. सकाळी ४ वाजता गाडीने मुंबईला निघायचे ठरवून आई बाबा निद्रा देवीच्या आधीन झाले. मला काही केल्या झोप येत नव्हती.. आधीच्या पोस्ट मध्ये पण होस्टेलचा बऱ्याच वेळा उल्लेख झालाय पण तरीही एक वेगळं पोस्ट लिहित आहे.

जे. जे. ला अडमिशन होऊन सुद्धा राहायचा प्रश्न अजून सुटला नव्हता. होस्टेलमध्ये अडमिशन घ्यायचे सगळे प्रयत्न करूनदेखील लिस्टमध्ये नाव नव्हते. सुरवातीला आतेबहिणीकडे डोंबिवलीवरून अप-डाऊन करताना माझी कसरत व्हायची. आधीच लोकलची सवय नाही आणि त्यात पहिल्या वर्षाला मोठी मोठी थर्मोकॉलची मॉडेल घेऊन कसे बसे लोकलमध्ये पाय ठेवायला जागा मिळायची. कधी एकदा होस्टेल मिळतंय असं झालं होतं. त्यात एकाकडून कळले इथे अडमिशन पाहिजे असेल तर मंत्रालयच्या चकरा मारा तरंच जमेल. दोन महिने कॉलेजला पण एवढं वेळेवर जात नाही एवढी आम्ही मंत्रालयची वेळ सांभाळली.

पहिल्या वर्षाला होस्टेलमध्ये सिनियर मस्त
रॅगिंग घेणार हा अलिखित नियम आहे. आम्ही पण याला अपवाद नव्हतो. पहिल्या दिवशी मी घाबरून माझ्या रूममधेच बसले होते. नंतर हळू हळू सवय व्हायला लागली. पण जास्त त्रास होण्यापेक्षा आम्ही स्वतःहून जास्त मजा करायचो. spiderman पासून चमेली पर्यंत सगळ्यांच्या नकला, फुलनदेवी आणि मुन्नाभाई च्या लग्नात आम्ही सगळे मनमुराद नाचलो. काही सेनियर्सशी पटलं आणि काहींशी बेक्कार वाजलं. ज्यांच्याशी वाजलं त्यांना तेच होस्टेल सोडेपर्यंत नाकी नऊ येईपर्यंत त्रास दिला. पण सगळी मजा, धमाल, धिंगाणा.

दिवाळीच्या सुट्टीत लवकर घरी पळायचं होतं तेव्हा सबमिशन संपवायला मारलेली पहिली night आणि पहिली जी.टी अजूनही आठवते. पहिल्या वेळी सगळे एकदम उत्साहाने काम करत होते, मधे मधे फोटो मधे पोज देत होते. सकाळी ३ वाजता बाल्कनीमधे चकाट्या पिटायची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर तशा अगणित रात्री आल्या गेल्या पण त्यांचा पाया त्या दिवशी घातला गेला. आर्किटेक्चरची सबमिशन म्हणजे कागदाचे मॉडेल आलेच आणि ती करायची तर एकत्रच..!! corridor मधे थर्मोकॉल, वेगवगळे कागद आणि fevibond च्या रिकाम्या पडलेल्या ट्यूब असा अशक्य कचरा व्हायचा. पण सगळे मिळून करताना खिदळखाना उघडून ठेवला जायचा.

दुसऱ्या वर्षाला एका विषयाच्या नुसत्या जी.टी मारल्या होत्या. स्वतः काढले तर कमी वेळ जाईल हे माहित असून सुद्धा रात्रभर जी.टी मारण्यासाठी नंबर लावून आम्ही जागायचो. रात्रीची पहिली कॉफी आणि ती पिण्यासाठी बाल्कनी मधे घेतलेली धाव अजूनही वेड हसवते. पाण्यासारखी थंड झालेली ती कॉफी पिताना बेक्कार हसलोय. रात्री एका रूम मधे दिवे बंद करून पाहिलेलं कित्येक सिनेमा, सबमिशन च्या वेळी ऐकलेली एक-सो-एक छपरी गाणी, मोठमोठ्याने खिदळत रेटलेले friends मधले dialogues, सगळं व्यवस्थित जमलं होतं.

नियम तोडणे होस्टेलमधेच जास्त शिकतो माणूस. माझ्या आयष्यात ही वेळ आली जेव्हा मी कॉफी मेकर घेतलं. सूप, maggi , चहा, कॉर्न भेल असे सगळे नियम आम्ही तोडले. रेक्टरची फेरी व्हायची तेव्हा कॉफी मेकर, इस्त्री लपवण्याच्या वेगवेगळ्या जागा शोधण्यात आम्ही पटाईत झालो होतो. cheese -maggi खाऊन अक्षरशः चाटून संपवलेली डीश, सोबत icedtea peach, ही माझ्या रूम मधली नेहमीचीच पार्टी. होस्टेलला लागणारे सगळे सामान वाटून घेतले जायचे. घरी आई आणते तसा किराणा आणायला crawford market ची फेरी व्हायची.
कोणाचा वाढदिवस असेल तर विचारायलाच नको. रात्री बारा वाजता केक खायला सगळे आसुसलेले असायचे. पोटात जावो व चेहऱ्यावर लागो, दंगा बेक्कार. त्यात chocolate केक चा corner piece खाण्यासाठी मारामार व्हायची. मोठ्याने गाणी लावून एक तास तरी वेड्यासारखे नाचायचो.

मेस च्या जेवण कधी आवडायचे नाहीच पण तरीही सगळे एकत्र बसून खाताना दोन घास जास्त जायचे पोटात. ताई च्या नकळत ताटात किती तरी वेळा रायता च्या दोन वाट्या जास्त घेतल्या असतील. जिलेबी असेल तर हक्काने ताटात डोंगर होईल एवढ्या घेतल्या जायच्या. रविवारी लवकर उठणे नसतेच पण १० ला उठून इडली आणि दुपारी चिकन खाण्यासाठी केलेली धावाधाव बघून नंतर आम्ही स्वतःवरच कित्येक वेळा हसायचो. शनिवार रविवार सुट्टी असेल तरीही दोन दिवस वाया घालवून रविवारची रात्रीची वेळ असायची काम चालू करायची.

तिसऱ्या वर्षाला जे.जे. च्या निकालाच्या politics ने आम्हाला हादरवून सोडले. होस्टेल मधून काढून टाकायची रेक्टरची रोजची दमदाटी दिवसाची सुरवात आणि शेवट डोळ्यातल्या पाण्याने व्हायची. लोकांच्या नजरा बदलायला कोणतेही कारण पुरेसे असते हा पुरेपूर अनुभव आला. होस्टेल मधे renovation चालू असताना वर खाली दोन्ही मजल्यांवर फ्लोरिंगच्या कामाचा ड्रिलिंगचा आवाज, परीक्षेच्या ७ दिवस आधी बदलायला लागलेली रूम आणि अजून कित्येक त्रासांमध्ये कसा अभ्यास केला आम्हालाच ठाऊक. चौथ्या वर्षाचा निकाल जेव्हा मनाप्रमाणे लागला तेव्हा आत्मविश्वास अजून वाढला. पण ह्या वेळी मनाचा धीर वाढला आणि स्वतःला कोणत्याही परिस्थिती मधून बाहेर काढायला शिकलो. आपण काय शिकतो आणि त्याची पद्धत घरच्यांना कधी कळली नाही त्यामुळे थोडेसे मार्क कमी झाले तर ऐकावा लागणारा ओरडा संपवून टाकायचा. होस्टेलला राहणार म्हणजे नक्की वाया जाणार अशी समाजाची concept हैराण करायची. घरची आठवण, प्रोफेसरने ऐन वेळी बदलायला लावलेले designचे टेन्शन, मरमरून काम करून पण करप्ट होणाऱ्या files रडवेलं करून टाकायच्या. पण अशा वेळी एकमेकांना धीर देत सगळे मदतीला धावून यायचे.
कित्येक गोड व कटू क्षण आले गेले पण त्यांनी आम्हाला घडवलं. आज कोणालाही मी आर्किटेक्ट आहे सांगताना या सर्व गोष्टी आठवून मान ताठ होते. आगळी वेगळी कहाणी नाहीये ही पण ती परत परत सांगायला कधीच कंटाळा येत नाही...!!

Tuesday, April 12, 2011

नजरेला भावते ते सर्वकाही...

पहिल्या पावसानंतर सांज खुलते अगदी तसेच रंग काल आकाशाने धरले होते. आज ऑफिस मधे असताना सरी यायला सुरवात झाली. आंब्यांसाठी हळहळ पण तरीही थंडाव्याने आम्ही सुखावलो होतो. ६.३० ला सुटले तशी गाडी जोरात हाकत घरी आले आणि तडक गच्चीत गेले. पुण्यात सहकार नगरला जरा डोंगरावरच घर असल्याने गच्चीतून जवळजवळ निम्मं पुणं दिसतं. पाऊस सुरु झाला तसं टप्प्याटप्प्याने भिजणाऱ्या पुण्याला बघताना मनोमन मी पण भिजत होते. अशा वेळी लाईट गेले तर ढगांचे गुलाबी केशरी रंग आणि मधेच कडाडणाऱ्या विजेच्या लखलखाटात कितपत दूर शहर दिसतंय हे बघायचा पोरकट प्रयत्न होतो.

लिफ्ट रूम च्या बाजूला पायरी वर बसून तासन तास आपल्या शहराकडे बघत बसायची लहान असल्यापासून सवयच जडलीये मुळी. सहकार नगर तसा शांत भाग असल्याने अजूनही मागे पाचगाव पर्वती च्या जंगलातल्या मोरांचा सकाळी आवाज कानी पडतो. हळू हळू वर्दळ सुरु होते तरीही आमच्या इथे प्रचंड शांतता असते. सकाळच्या कोवळ्या किरणात पुण्याला जागे होताना बघायला बऱ्याच वेळा मी गच्चीत धाव घेते. लालबुंद सूर्याचा गोल वर येताना खोलवर मनात मृत्युंजय मधले शब्द आठवतात. दोन गल्ल्या तरी दूरवरून येणाऱ्या कोकिळेचा आवाज अजून साद घालतो. सात वाजायला येतात तोवर आईने स्वयंपाकघराच्या खिडकीत टाकलेले दाणे खायला रानटी पोपट धुमाकूळ घालतात. उन्हाळ्यात फुललेल्या पिवळ्या बहाव्यावर हे मनसोक्त राज करतात. हिवाळ्यात सकाळी सकाळी रोज भारद्वाज जोडीने दर्शन देतात. थंडीत घुमणारा भोंग्याचा आवाज ऐकताना शहराची वर्दळ दिसली नाही तरी जाणवते.

मुंबईला असताना हाच अनुभव फक्त गच्ची नाही तर बाल्कनी मधून आम्ही घ्यायचो. मरीन ड्राईव्ह चे सौंदर्य खुलून दिसणारी वेळ म्हणजे समाची वेळ. भरती आणि ओहोटीच्या मधे पाणी जेव्हा काही काळ स्थिर होते ती. सकाळच्या धुक्यातली जीवाची मुंबई तेव्हा बघताना एखाद्या डोंगरातल्या कुशीतल्या गावाप्रमाणेच शांत जाणवते. सकाळी चार वाजता पहिल्या लोकल चा, मरीन ड्राईव्ह वरचा हळू हळू वाढणारा गाड्यांचा आवाज या शहराची आठवण बनून राहून गेलाय आता.

पुणे असो की मुंबई किंवा अहमदाबाद, सूर्यास्ताचे आकाश कुठेही मला वेड लावते. निरनिराळ्या रंगांचा रोज एक नवीन कॅनवास आणि रात्री त्या शहराचा उजाळा बोल्ड करणारा त्याच आकाशाचा काळाशार पट्टा.. समेच्या वेळी क़्विन्स नेकलेस चे प्रतिबिंब त्या समुद्रात बघत होस्टेल च्या बाल्कनीत किती तरी वेळ आम्ही बसले असू. जणू inception सिनेमा अनुभवल्या प्रमाणे. पुण्यात पर्वती वरून, आमच्या घराच्या गच्चीतून, चांदणी चौक मधल्या up and above मधून थंडगार वाऱ्याच्या सोबतीने शहराकडे अनेकदा शांतपणे बघत बसणे माझा आवडता विरंगुळा आहे. गच्चीतून सरळ समोर दुरवर नजर टाकली की सिटी प्राईडचे लोगो मधले तारे लुकलुकताना दिसतात.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे वरून जर कधी रात्री येणं झालं तर दोन कमालीच्या धकाधकीच्या शहरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट हायवेच्या घाटातून खोपोली गाव बघणं कितीही टिपिकल असलं तरीही आपलं मन शांत होताना आणि एक वेगळाच आनंद अनुभवल्याचं जाणवतं. प्रवास बसचा असो वा ट्रेनचा, कुणास ठाऊक मागे पडणाऱ्या झाडांना बघणे मला फार भावते. २-३ सेकंदासाठी फक्त आपल्या आयुष्याचा भाग होऊन ती तशीच उभी असतात. अंगणातल्या बागेतल्या झाडांना रोज काळजी घेऊन पण ती जेवढी टवटवीत असतात त्यापेक्षा ही झाडे मला जास्त टकमकीत वाटतात. पुणे-जळगाव प्रवास सध्या स्लीपर बस ने होत असल्याने एरवी न दिसणारे लाखो तारे झोप येऊच देत नाहीत.

देओतीब्बाच्या ट्रेकला एका कॅम्प जवळ आम्ही एक झकास जागा शोधून काढली होती. झऱ्याच्या पाण्यामध्ये एका आडवा मोठ्ठा खडपावर आम्ही निवांत पडी टाकायचो. बोचरा वारा आणि पाण्याची झुळझुळ.. डोळे उघडल्यावर दूरवर दिसणारी बर्फाशी शिखरे.. खरंच एक प्रकारचा निर्वाणा आहे.

लहानपणी आत्या कडे अलिबाग जवळ आवास नावाचे छोटेसे गाव आहे, तिकडे एकदा पौर्णिमेच्या आसपासच्या दिवशी रात्री समुद्रावर भटकायला गेलो होतो. पांढऱ्या शुभ्र प्रकाशात चमकणारी समुद्राची वाळू व फेसाळणाऱ्या लाटांनी मला कितीतरी वेळ एकाजागी स्तब्ध उभे करून ठेवले होते.. मी मागे पडल्याने नंतर आई चिंतेने पण फटकारत घरी घेऊन गेली त्यानंतर कधी रात्री फिरायची वेळ नशिबात आली नाही.

आता मोठे झालो तेव्हापासून परत एकदा अशाच एका किनाऱ्यावर जायचा मानस आहे.. ऑटोकॅडच्या zoom in-zoom out मधून चार क्षण बाजूला काढून.. सुट्टीचे अगदीच जमले नाही तर गच्ची आहेच..

Wednesday, March 30, 2011

३२-१

महिन्यातून दोन तीन वेळा तरी पडणारे माझे एक भयानक स्वप्न, भूताला पण मी एवढी घाबरत नाही एवढं. तशी मला झोप खूप प्रिय पण खडबडून जाग आणणारं, रग-चादर-उश्या बाजूला फेकून देऊन तडमडत आरश्यासमोर आ वासून उभं रहायचं आणि तपासायचं, आपले सगळे दात जागेवर आहेत की नाही..
हो, अगदी समोरच्या दातापैकी एक पडल्याच्या या स्वप्नाची मला बेक्कार भीती वाटते. तसा माझा चेहरा हसरा असल्याने त्यात एक खिडकी पडलेली दिसणं कितीही गाढ झोपेतून मला उठायला लावतं.

आमचे नात्याने दूरचे पण तरीही जवळचे जोडपे dentist आहेत. त्यांचं क्लिनिक आमच्या घराजवळच असल्याने बऱ्याचदा भेट होते. पेशंट बनून गेलो नाही इतक्या वेळा गप्पा मारायला गेलो असू. पण पहिल्यांदा वेळ आली बाबांची. त्यांचं root canal करायच्या वेळी. त्यांचा सगळाच प्रकार खूप किचकट असल्याने जवळजवळ एक महिना यात गेला. नक्की root canal करताय की canal खणताय असं सहज मजेत मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी चिल मधे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण ऐकून वाट माझी लागायची. एका वेळी चार dentist लोकांनी आपापले डोके खाजवत हे सगळे शेवटी पार पाडले तरीही आमच्या बाबांचा चेहरा शांत.

पुण्यात आल्यावर आपल्या सगळ्या नातेवाईकांना मला भेटवणे आमच्या बाबांचा आवडता छंद. माझे thesis झाल्यानंतर सुट्टीत सहज परत ताई कडे जायचा योग आला.पण नंतर इंटर्नशिपमुळे जवळ जवळ तीन महिने भेटणं झालं नाही.

दोन दिवसापूर्वी शेवटची पूर्ण बाहेर न आलेली अक्कलदाढ जरा त्रास द्यायला लागली. सगळं काही ठीक आहे की नाही ते बघण्यासाठी आम्ही ताई कडे गेलो. आतुन मी थोडीशी घाबरलेलीच होते. पण धीर धरत मी तिच्या क्लिनिक मधे पाऊल ठेवले. एका सर्जरी नंतर हुश्श करत माझा चेहरा बघून ती थोडी सुखावली होती. सध्या काय चालू आहे तेव्हा इंटर्नशिप उत्तर ऐकून तिने माझे अगदी (आनंदाने) प्रोफेशनल स्वागत केले. आई बाबा बरोबर असल्याने साहजिकच गप्पा सुरु झाल्या. काही वेळाने त्या माझ्या भविष्यावर येऊन टपल्या. लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्यावर "माझी दाढ दुखतेय जरा बघ ना" म्हणत मी विषय बदलला. पण लगेच तिने आपली equipments काढून चेकअपला सुरवात केली. तिच्या लक्षात आले की येणारी दाढ तिरकी येतेय. तिची जागा आणि वाढ बघता पुढे त्रास होणार तर आत्ताच काढून टाकलेली बरी असा सल्ला ताईने दिला.

माझ्यावर टाईम बॉम्ब पडला...

काहीच त्रास होणार नाही, खूप साधी case आहे वगैरे सांगून मला धीर देण्याचा असफल प्रयत्न तिघांनी केला. माझी नकाराची घंटा सुरु झाली. येत्या शनिवारी आटपून टाकू बाबांनी शांतपणे तिला सांगत आम्ही निघालो. ही माझी पहिलीच वेळ असल्याने भीतीने डोळ्यात पाणी टिकेना. खराब मूड सांभाळायला मला वैशाली मधे नेण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदा इडली माझ्या घशाखाली उतरत नव्हती. नंतर एका लहान मुलाला देतात तसं icecream पण देण्यात आलं. बरोबरच होतं म्हणा, मी लहान मुलासारखीच वागत होते.

रात्री फोन वर एका मित्राशी बोलताना पण भीती कमी होत नव्हती. पहिले मजेत बोलताना समजवायचा प्रयत्न झाला. तोंडात liquid nitrogen भरून सगळं गोठल्यावर एका बुक्कीत फत्ते.. वगैरे.. पण माझ्या डोक्यात ही भीती फेविकॉल सारखी चिकटली होती. रात्रभर झोप नावाचा प्रकार माझ्या खोलीत फिरकला नाही. खरंतर झोप उडण्याएवढी मोठी गोष्ट नाही ही पण का कुणास ठाऊक माझ्या डोक्यातून हा विचार गेला नाही. काही स्वप्न खरी होतात असं ऐकलंय. तशी बरीच झाली आहेत पण याची भर नसती तर चाललं असतं असं रात्रभर देवाला ओरडून ओरडून सांगावसं वाटलं. सकाळी दात घासताना लवकरच आपली ३२-१ एकतीशी उरणार आहे ते सहनच होत नव्हतं. पण ९०% स्वप्न खरं होणार नसल्याने म्हणजे समोरच्या ऐवजी मागचा एक दात कमी होणार असल्याने जरा हायसे वाटले..

आता शनिवारी वर्ल्ड कप फायनल बरोबर आमची पण लढाई रंगणार आहे. बघू, कशी वाट लागते ते.....

Wednesday, March 23, 2011

एका रस्त्यावरचे आयुष्य


नेताजी सुभाष रस्ता हे माझ्या आयुष्यातलं एक सुरेख पर्व आहे. 'जे.जे. आर्किटेक्चर'ला असताना माझी admission इथल्या सरकारी होस्टेलला झाली. ४०,००० रुपये स्क्वे.फूट च्या जागेत ६ महिन्याला फक्त ४,००० रुपये देऊन राहायला मिळत असेल हे ऐकून कोणीही वेड्यात काढेल. अन् सुभाष रस्ता सांगितलं तर ... एक मिनिट.. मरीन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेस म्हणजे आपला मराठीत नेताजी सुभाष रस्ता..!!

मित्रहो .. जळफळाट झाला का जरा..??

नेकलेस च्या साधारण मध्यभागी आमचं होस्टेल.. हो.. हे मी आणि इथे राहणाऱ्या बऱ्याच मुलींच्या आयुश्यातलं एक गोड सत्य आहे. ५ मजली जुन्या मॉडर्न स्टाईलचं बांधकाम, समोर दररोज एका नवीन ठेवणीचा निसर्गाचा wallpaper, आकाशाची निळाई, समुद्राचं खारं वारं.. किनारा म्हणता नाही येणार पण त्याप्रमाणेच थोडीफार भासणारी चौपाटी. रात्री दिवांची माळ अन् सुसाट जाणाऱ्या गाड्या... बऱ्याच लोकांनी केलेल्या या वर्णनाला अजून मी तरी किती शब्द वाढवणार म्हणा.

पहिल्या वर्षाला असताना खूप उड्या मारत आम्ही सगळ्या मुली इथे आलो. तेव्हा बराच वेळ असायचा मग बऱ्याच वेळा संध्याकाळी आम्ही walk ला जायचो. रोजचा सूर्यास्त बघायचा, समोर बसून चकाट्या पिटायच्या की दिवस संपला.

दुपारी भर उन्हात हाल व्हायचे. बस थांबा सोडला तर सावलीला फक्त नारळाची झाडं. इथेच संपलंय सगळं. त्यामुळे taxiमधून उतरताना सिग्नल हिरवा होईपर्यंत उन्हाचा अगदी ताप यायचा. सिग्नल मोडणं इथे जरा जीवाला धोकाच. तरीही दीडशहाणे लोक असतातच. भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांच्या मधे येणं आम्हाला धजावायचं नाही. त्यामुळे ज्या दिवशी सिग्नल बंद किंवा खराब असेल तेव्हा बेक्कार कसरत व्हायची.

रविवार म्हटला की मरीन ड्राईव्हला जत्रेचं स्वरूप असतं. बड्या लोकांपासून सामान्यापर्यंत सर्वजण येथे दिसतात. फरक फक्त त्यांच्या पोशाख आणि गाड्यांमधे असतो. बड्या brand च्या कार आणि बाईक बघणं ज्यांचा छंद त्यांना तर पर्वणीच. रोज कितीही वेळ रहदारी कडे बघितलं तरी कसा वेळ जातो कळत नाही. होमसिक झालं की खिडकीबाहेर टक लावून बघत बसायची सवयच लागली. कैवल्यधाम मधे योगा करताना ताडासनाच्या वेळी क्षितिजावर मंद गतीने हलणाऱ्या cargo ships वर नजर खिळायची. आजची किती मोठी, कालची किती छोटी, एका वेळी किती पहिल्या, कोणती जोरात पुढे गेली, कोणती किती वेळ एकाच जागी आहे या चर्चा नंतर रंगायच्या. पुढे पाचव्या वर्षाला thesis topic चा प्रोजेक्ट मी जेव्हा automobile museum निवडला त्याचा पाया या रस्त्याने आधीच घालून ठेवला होतं जणू.

पावसाळा आला की समुद्राचे ते उधाण रूप बघायला मजा यायची. आकाशाप्रमाणे रंग बदलणारं पाणी, सुसाट वारा की आपणच उडून जाऊ आणि भरतीला tetrablock वर फुटणाऱ्या उंच लाटा. ही लाट जेव्हा ४.५ मीटर पेक्षा उंच येणार असं हवामान खाते सांगते तेव्हा तर तांडवच. पण तेच ओहोटीला दुरवर पसरलेला कचरा बघून वाईट वाटायचं. दिवसातून दोन वेळा ओहोटी असा संपूर्ण पावसाळा महापालिकेचे कर्मचारी रस्ता साफ ठेवायचे. थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या.  मार्ग नाही पण ते त्याला कधीच नाही म्हणत नाही.

मुंबईचा पाऊस आला तर मुसळधार, नाहीतर एक थेंब नाही. तुरळक सरी नावाचा प्रकार नाही. त्यात भरतीची वेळ असेल तर सोसाट्याचा वारा.. छत्री शक्यतो न उघडलेलीच बरी. संपूर्ण काडीची तरी ठीक पण फोल्डिंग ची असेल तर garantee फक्त ५ मिनिटाचीच आणि तुम्ही चिंब भिजणार हे नक्की. तरीही हौसेने भिजायला येणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. पावसाचा आवाज आल्या आल्या होस्टेलच्या खिडक्या बंद करणे म्हणजे roadies पेक्षा अवघड टास्क. जुन्या लाकडी खिडक्या वाऱ्यामुळे आत ओढताना हालत खराब व्हायची. तोपर्यंत पाणी आत आलेले असणार. वर कष्टाने बंद करण्यात सफल झालो तरीही waterproofing वरचा भरवसा कधीच उठला होता. (सरकारी काम शेवटी) कॉलेज मधून आल्यावर ओले कपडे वाळवणे, पाण्यापासून laptop आणि submissions वाचवणे यासाठी इस्त्री आणि पंखाच मदतीला धावायचा. उन्हाळ्यात पण एवढं विजबील येत नसेल तेवढं पावसाळ्यात येत असेल आमच्या होस्टेलचं.. :) पण याचा वैताग कधीच नाही आला.

एरवी mobile वर पर्सनल गप्पा असतील तर आमची बाल्कनी आम्हाला फार प्रिय. रात्री- अपरात्री बऱ्याच वेळा आम्ही बाल्कनीत उभे राहायचो. थोडा ट्राफिक चा जोर कमी असायचा. या वेळी शांतपणे लाटांचा आवाज ऐकत आमच्या बाकड्यावर आम्ही सांडायचो. submissions च्या वेळी मधेच विरंगुळा म्हणून आपापल्या रूम सोडून आम्ही शांतपणे बाल्कनीत गप्पा मारायचो. रात्री टवाळक्या करणारी पोरं मोठ्याने बळच "पूजा" नावाने ओरडायची. उगाच.. अंगात मस्ती...

गणपतीची मिरवणूक बघायला आमची टेरेसवर वर गर्दी व्हायची. दुरवर अडकलेलं ट्राफिक, वाजतगाजत नेणारे गणपती, हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या पाण्यावर आलेली वलय आणि एका वेगळ्याच जोशाने सजलेले मुंबईकर, vintage car rally याची देही याची डोळा अन् ते पण घर बसल्या, मंत्र्यांच्या भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा ताफा अन् शुटींग च्या भोवती माणसांचा घोळका असे कितीतरी क्षण.
 
वर्षातला एकाच दिवस असतो जेव्हा इथे "pindrop silence" असतो. तो दिवस म्हणजे marathon चा दिवस. या दिवशी ट्राफिक दुसऱ्या दिशेला वळवले असते. जिमखाना मैदानावर बऱ्याच वेळा मोठ्या घरातले लग्न समारंभ होतात. त्यांची नयनरम्य आतिषबाजी अगदी फुकट बघायला मिळते. वानखेडे, ब्रेबॉर्नला कधी क्रिकेटचा सामना असेल तर मग विचारायलाच नको. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत (आणि त्यांची कुत्री सुद्धा) येथे वेळ दवडायला पुढे मागे पाहत नाहीत.

मधेच एखादा करकचून ब्रेक दाबायचा आवाज आला की काळजाचा ठोका चुकायचा. उघड्या डोळ्याने पाहिलेले ओबेरॉय चे स्फोट व चौपाटीवरच्या encounter नंतर दारूगोळ्याच्या वासाने आजही अंगावर शिरशिरी येते. एरवी दिमाखाने उभे असणारे ओबेरॉय होटेल त्या रात्री काळोखात गुडूप झाले होते. ४ दिवस होस्टेल ला दबकूनच होते सगळे. सर्व न्यूज, वर्तमानपत्र वाचून, मोबाईल वर शेकडो काळ्जीस्वरांना उत्तरं देता देता धीर संपत होता. दुसऱ्या दिवशी चील मधे जॉगिंग करताना मुंबईकरांनी एक वेगळाच धडा आम्हाला शिकवला.

उत्सव, rally, सर्व ऋतू, accidents अशा कितीतरी गोष्टी सामावून घेऊन या मरीन ड्राईव्हने तिथला ऐकन् एक क्षण एखाद्या स्वप्नाप्रमाणे फुलवलाय अन् बरेच काही शिकवलेय.. कदाचित आत्ताचे काही क्षण माझ्या कॅमेरातून आणि पोस्ट वाचून तुम्हाला सुद्धा ते अनुभवता आले असतील...!!

Wednesday, March 16, 2011

कितीतरी गोष्टी .... उन्हाळ्याच्या...!!

पुण्याचा उन्हाळा म्हणजे रखरखीत ऊन अन् दुपारी गरम झळा  पण संध्याकाळ होताच मंद थंड वारा..!!

कोकिळेची तान.. टेरेस मधे खारीचा नाच.. पोपटांचे थवे.. हल्ली कधीतरीच चिमण्यांचा चिवचिवाट.. मालकाबरोबर "walk"ला निघालेली कुत्र्याची पिल्लं.. मधेच गुल होणारी मांजरं.. पाचगाव पर्वती वरचे रोज दिसणारे मोर..  .. .. कितीतरी गोष्टी ..!!

झाडावरच्या कैऱ्या.. करंडीतले आंबे.. शाळेबाहेर आजींकडच्या चिंचा.. समोरच्या गाड्यावरचा बर्फाचा गोळा.. रेशनवाल्या काकांकडे चोरून खाल्लेला पेप्सीकोला.. लाल कापडावरची कलिंगड फ्रूट डिश.. कावरे, सुजाता, गणू शिंदे.. दुपारी घंटी वाजवत येणारा कुल्फीवाला.. लस्सी, ताक, मठ्ठा, ज्यूस, थंडाई, मिल्कशेक, सरबत.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

१०वी १२वी च्या परीक्षा.. engineering च्या सुट्ट्या.. ऑफिस मधली प्रोमोशन्स.. २८ फेब्रुवारीचं बजेट.. आयुकाची फ्री ट्रीप.. industrial new year.. मराठी गुढीपाडवा.. होळीचा चटका.. रंगपंचमीचा ओलावा.. एप्रिल चे fools.. मे चा अभिमानी कामगार.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

 डोक्यावर स्कार्फ, नखशिखांत त्वचा सूर्यापासून वाचवणाऱ्या मुली.. सनकोट gloves ची खरेदी करणाऱ्या असंख्य बायका.. हेल्मेट , गॉगल चढवून फिरणारी मुलं... AC चालू ठेवून थंडपणे कार चालवणारी माणसं.. छत्री सावरत डुलत डुलत जाणारे आजीआजोबा.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

सुट्ट्यांचं कधीही न संपणारं planning.. कधीतरीच confirm होणारं रेल्वेचं तिकीट.. शेवटी आपलीच गाडी काढून केलेल्या कोकणसहली.. महाबळेश्वर माथेरान च्या strawberries.. water kingdom च्या फेरी.. समुद्रात डुंबायची लहान्यांची मजा... मोठ्यांच्या सूर्यास्ताच्या आठवणी.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

morning walk नंतर वाडेश्वर ला जमलेली गर्दी.. कॅडबी बाहेर जमलेली कितीतरी टोळकी.. जास्तीत जास्त softy खाण्याचा पैजा.. रात्री पाण्याच्या टाकी शेजारी मित्रांच्या न संपणाऱ्या गप्पा.. मग  तो वळवाचा पाऊस.. गाड्या काढून भिजत दुरवर भटकणारी तरुणाई.. घरीच गरम गरम भजींवर ताव मारणारी मागची पिढी.. चिंब भिजून खायची नुकतीच तळलेली जिलेबी.. शेवटी पोट भरून उरणारी चेतन्य च्या पराठ्याची कहाणी..  .. .. कितीतरी गोष्टी ..!!

धरणीला भेगा.. पाण्याच्या रांगा.. विजेचा लपंडाव.. कागदाचे पंखे.. नेमके त्याच वेळी world cup चे सामने..  सरकारला शिव्या   .. .. कितीतरी गोष्टी ..!!

पण शेवटी शांत होणाऱ्या मातीचा सुगंध..... अश्याच .. .. .. कितीतरी गोष्टी ..!!