Friday, June 3, 2011

पाऊस असा रुणझुणता..

पाऊस काय सुरु झाला फेसबुक वर स्टेटस अपडेट करायला लोकांना अगदी ऊत आला.. मी पण काय त्यात कोणी वेगळी नाही. फरक फेसबुक ऐवजी फक्त ब्लॉगचा आहे. गेले काही दिवस लिहायला वेळ झाला नाही. पण आज थोडसंच का होईना पण लिहण्यावाचून राहवलं नाही.

साडेचार वर्षानंतर आज पुण्यातला पाउस अनुभवतेय. साईट वर जाताना सर बोलून गेले आज पाऊस पडणार. रणरणत्या उन्हात पुणे विद्यापीठाची मंडळी आमचं काम बघायला साईटवर येणार होती. सगळं नीट पार पडलं तसे मी आणि सर ऑफिस कडे परत निघालो. तोपर्यंत ढगांनी आपले रंग बदलले होते. त्यात पाषाण रस्त्याने स्वतःचा एक नवीनच कॅनवास रंगवला होता. दोन्ही बाजूने गुलमोहोर बहरला होता. त्यात मधे मधे बोगनवेल आपल्या गुलाबी पांढऱ्या छटांमध्ये खुलून दिसत होती.

चांदणी चौक पार केला तसं समोर कोथरूड वर उठलेलं धुळीचं वावटळ दिसलं. सरांनी गाडीचा वेग वाढवला. गाडीत दोन प्रोजेक्टची कागदाची मॉडेल असल्याने त्यांना पावसापासून वाचवणं जास्त महत्वाचं होतं. गाडी ऑफिसखाली आली तसे पटापट आम्ही मॉडेल खाली उतरवले आणि लिफ्ट कडे धाव घेतली. गाडी पार्किंग मधे घातली तेवढ्यात वरचं झाड कोसळलं. पण आमची धावपळ कामी आली. आत पाऊल ठेवलं आणि समोर सगळे कागद भिरभिर उडत होते आणि खिडक्या लावायला सगळे पळत होते. गरम चहाची ऑर्डर सोडली. नंतर ओघानेच सगळी पावसाची गाणी सगळ्यांनी लावली. गप्पा सुरु झाल्या.

आपापल्या कॉलेजच्या आठवणीत सगळे रमून गेले. पहिल्या पावसाच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कथा. कोणी सिंहगड तर कोणी लवासा, कोणी मरीन ड्राईव्ह तर कोणी खडकवासला.  गरम गरम भजी असो वा जिलबी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी.. चिखलात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच. काहीना दुरवर भटकून येण्याची आवड तर काहीना गच्चीवर जाऊन बसण्याची आवड.

कधीतरी साचलेल्या पाण्यापासून गाडी वाचवत स्वतःला सांभाळणारे लोक तर कुठे त्याच पाण्यात उड्या मारणारी बच्चे कंपनी. चिखलातून पाय खाली न टेकवता सरळ गाडी पुढे काढायची कसरत तर कुठे दुसऱ्यावर सुर्रकन पाणी उडवून जाणारया ४ व्हीलर्स. चप्पल कमी नक्षीकाम करेल पण बाईकवाल्यांचे मागचे टायर अफाट कारंज उभे करेल.

मान्सून ट्रेकचे प्लान्स आजकाल ठरवायला लागत नाहीत. गाडी काढून मुळशी गाठायला कोणी मागेपुढे पाहत नाही. कितीही दरड कोसळली तरी माळशेज आपला दुधसागरने सर्वांना बोलावतच राहतो. कोकण रेल्वेचा प्रवास फक्त निसर्गदर्शनासाठी केला जातो. कितीही उसळल्या लाटा तरी समुद्राकडे जाववून राहवत नाही.

पावसाकडे शून्यात बघत जुन्या आठवणी ताज्या होतात. पाऊस असा रुणझुणता.. सलीलचे गाणे साद घालते.. हिंदी मराठी इंग्लिश सगळी पावसाची romantic गाणी playlist मधे आपली जागा बनवतात.

आणि यात ऐन पावसात महानगरपालिका रस्त्यांची कामं काढणार. परत आता रस्त्यावर खड्डे वाढणार, चिखलात चाक फसणार, विजा कडकडणार,झाडं पडून खांब पडणार, तासन तास लाईट जाणार, कामाच्या वेळी धो धो वरुणराजे कोसळणार, रेनकोटची बटनं टिकणार नाही, ओल्या कपड्यांमधेच काम करायला लागणार, गाडीचे ब्रेक तर लागणारच नाही, पाणी साचून वाहतूक ठप्प होणार.. सरासरीपेक्षा कमीजास्त पाऊस पडणार, हवामानखात्याचे अंदाज नेहमीच चुकणार, कुठे पूर तर कुठे कृत्रिम पाऊस, चिकचिक कधी संपणार नाही.

वर्षोनुवर्षे चालणारे तेच कधीही न बदलणारे चित्र, कितीही वेळा रंगवले तरी बदलणार नाही..

2 comments:

Sudiiiiii said...

:)

ओजस चौधरी said...

आमच्या इकडे कधी पण पाऊस पडतो आणि काहीच तुंबत नाही किवा दिवे जात पण नाही त्यामुळे काही मजा येत नाही....पाऊसाचे रुद्र रूप दिवे गेल्यावरच मस्त अनुभवता येते.....तू लकी आहेस की हेय सगळे तू अनुभवते आहेस....