Friday, May 6, 2011

द "होस्टेल" पार्ट ऑफ लाईफ....!!

बऱ्याच दिवसाने लिहितेय आज. एप्रिल महिना, शेवटची परीक्षा झाली, होस्टेलची रूम रिकामी करायला ३० एप्रिल पर्यंत मुदत दिली. पण परीक्षा होऊन २० दिवस झाले तरी शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यात होस्टेल सोडायची हिम्मत नव्हती. मरीन ड्राईव्ह सोडवत नव्हता. सकाळी ४ वाजता गाडीने मुंबईला निघायचे ठरवून आई बाबा निद्रा देवीच्या आधीन झाले. मला काही केल्या झोप येत नव्हती.. आधीच्या पोस्ट मध्ये पण होस्टेलचा बऱ्याच वेळा उल्लेख झालाय पण तरीही एक वेगळं पोस्ट लिहित आहे.

जे. जे. ला अडमिशन होऊन सुद्धा राहायचा प्रश्न अजून सुटला नव्हता. होस्टेलमध्ये अडमिशन घ्यायचे सगळे प्रयत्न करूनदेखील लिस्टमध्ये नाव नव्हते. सुरवातीला आतेबहिणीकडे डोंबिवलीवरून अप-डाऊन करताना माझी कसरत व्हायची. आधीच लोकलची सवय नाही आणि त्यात पहिल्या वर्षाला मोठी मोठी थर्मोकॉलची मॉडेल घेऊन कसे बसे लोकलमध्ये पाय ठेवायला जागा मिळायची. कधी एकदा होस्टेल मिळतंय असं झालं होतं. त्यात एकाकडून कळले इथे अडमिशन पाहिजे असेल तर मंत्रालयच्या चकरा मारा तरंच जमेल. दोन महिने कॉलेजला पण एवढं वेळेवर जात नाही एवढी आम्ही मंत्रालयची वेळ सांभाळली.

पहिल्या वर्षाला होस्टेलमध्ये सिनियर मस्त
रॅगिंग घेणार हा अलिखित नियम आहे. आम्ही पण याला अपवाद नव्हतो. पहिल्या दिवशी मी घाबरून माझ्या रूममधेच बसले होते. नंतर हळू हळू सवय व्हायला लागली. पण जास्त त्रास होण्यापेक्षा आम्ही स्वतःहून जास्त मजा करायचो. spiderman पासून चमेली पर्यंत सगळ्यांच्या नकला, फुलनदेवी आणि मुन्नाभाई च्या लग्नात आम्ही सगळे मनमुराद नाचलो. काही सेनियर्सशी पटलं आणि काहींशी बेक्कार वाजलं. ज्यांच्याशी वाजलं त्यांना तेच होस्टेल सोडेपर्यंत नाकी नऊ येईपर्यंत त्रास दिला. पण सगळी मजा, धमाल, धिंगाणा.

दिवाळीच्या सुट्टीत लवकर घरी पळायचं होतं तेव्हा सबमिशन संपवायला मारलेली पहिली night आणि पहिली जी.टी अजूनही आठवते. पहिल्या वेळी सगळे एकदम उत्साहाने काम करत होते, मधे मधे फोटो मधे पोज देत होते. सकाळी ३ वाजता बाल्कनीमधे चकाट्या पिटायची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर तशा अगणित रात्री आल्या गेल्या पण त्यांचा पाया त्या दिवशी घातला गेला. आर्किटेक्चरची सबमिशन म्हणजे कागदाचे मॉडेल आलेच आणि ती करायची तर एकत्रच..!! corridor मधे थर्मोकॉल, वेगवगळे कागद आणि fevibond च्या रिकाम्या पडलेल्या ट्यूब असा अशक्य कचरा व्हायचा. पण सगळे मिळून करताना खिदळखाना उघडून ठेवला जायचा.

दुसऱ्या वर्षाला एका विषयाच्या नुसत्या जी.टी मारल्या होत्या. स्वतः काढले तर कमी वेळ जाईल हे माहित असून सुद्धा रात्रभर जी.टी मारण्यासाठी नंबर लावून आम्ही जागायचो. रात्रीची पहिली कॉफी आणि ती पिण्यासाठी बाल्कनी मधे घेतलेली धाव अजूनही वेड हसवते. पाण्यासारखी थंड झालेली ती कॉफी पिताना बेक्कार हसलोय. रात्री एका रूम मधे दिवे बंद करून पाहिलेलं कित्येक सिनेमा, सबमिशन च्या वेळी ऐकलेली एक-सो-एक छपरी गाणी, मोठमोठ्याने खिदळत रेटलेले friends मधले dialogues, सगळं व्यवस्थित जमलं होतं.

नियम तोडणे होस्टेलमधेच जास्त शिकतो माणूस. माझ्या आयष्यात ही वेळ आली जेव्हा मी कॉफी मेकर घेतलं. सूप, maggi , चहा, कॉर्न भेल असे सगळे नियम आम्ही तोडले. रेक्टरची फेरी व्हायची तेव्हा कॉफी मेकर, इस्त्री लपवण्याच्या वेगवेगळ्या जागा शोधण्यात आम्ही पटाईत झालो होतो. cheese -maggi खाऊन अक्षरशः चाटून संपवलेली डीश, सोबत icedtea peach, ही माझ्या रूम मधली नेहमीचीच पार्टी. होस्टेलला लागणारे सगळे सामान वाटून घेतले जायचे. घरी आई आणते तसा किराणा आणायला crawford market ची फेरी व्हायची.
कोणाचा वाढदिवस असेल तर विचारायलाच नको. रात्री बारा वाजता केक खायला सगळे आसुसलेले असायचे. पोटात जावो व चेहऱ्यावर लागो, दंगा बेक्कार. त्यात chocolate केक चा corner piece खाण्यासाठी मारामार व्हायची. मोठ्याने गाणी लावून एक तास तरी वेड्यासारखे नाचायचो.

मेस च्या जेवण कधी आवडायचे नाहीच पण तरीही सगळे एकत्र बसून खाताना दोन घास जास्त जायचे पोटात. ताई च्या नकळत ताटात किती तरी वेळा रायता च्या दोन वाट्या जास्त घेतल्या असतील. जिलेबी असेल तर हक्काने ताटात डोंगर होईल एवढ्या घेतल्या जायच्या. रविवारी लवकर उठणे नसतेच पण १० ला उठून इडली आणि दुपारी चिकन खाण्यासाठी केलेली धावाधाव बघून नंतर आम्ही स्वतःवरच कित्येक वेळा हसायचो. शनिवार रविवार सुट्टी असेल तरीही दोन दिवस वाया घालवून रविवारची रात्रीची वेळ असायची काम चालू करायची.

तिसऱ्या वर्षाला जे.जे. च्या निकालाच्या politics ने आम्हाला हादरवून सोडले. होस्टेल मधून काढून टाकायची रेक्टरची रोजची दमदाटी दिवसाची सुरवात आणि शेवट डोळ्यातल्या पाण्याने व्हायची. लोकांच्या नजरा बदलायला कोणतेही कारण पुरेसे असते हा पुरेपूर अनुभव आला. होस्टेल मधे renovation चालू असताना वर खाली दोन्ही मजल्यांवर फ्लोरिंगच्या कामाचा ड्रिलिंगचा आवाज, परीक्षेच्या ७ दिवस आधी बदलायला लागलेली रूम आणि अजून कित्येक त्रासांमध्ये कसा अभ्यास केला आम्हालाच ठाऊक. चौथ्या वर्षाचा निकाल जेव्हा मनाप्रमाणे लागला तेव्हा आत्मविश्वास अजून वाढला. पण ह्या वेळी मनाचा धीर वाढला आणि स्वतःला कोणत्याही परिस्थिती मधून बाहेर काढायला शिकलो. आपण काय शिकतो आणि त्याची पद्धत घरच्यांना कधी कळली नाही त्यामुळे थोडेसे मार्क कमी झाले तर ऐकावा लागणारा ओरडा संपवून टाकायचा. होस्टेलला राहणार म्हणजे नक्की वाया जाणार अशी समाजाची concept हैराण करायची. घरची आठवण, प्रोफेसरने ऐन वेळी बदलायला लावलेले designचे टेन्शन, मरमरून काम करून पण करप्ट होणाऱ्या files रडवेलं करून टाकायच्या. पण अशा वेळी एकमेकांना धीर देत सगळे मदतीला धावून यायचे.
कित्येक गोड व कटू क्षण आले गेले पण त्यांनी आम्हाला घडवलं. आज कोणालाही मी आर्किटेक्ट आहे सांगताना या सर्व गोष्टी आठवून मान ताठ होते. आगळी वेगळी कहाणी नाहीये ही पण ती परत परत सांगायला कधीच कंटाळा येत नाही...!!

2 comments:

ओजस चौधरी said...

नेहमी सारखाच आत्ती उच्च....मला होस्टेल ची मजा माहित नाही पण जे लिहिले आहे ते बाप आहे....

SwanandK said...

apratim lihil ahes..