Monday, June 13, 2011

गंधर्व .. !!

महिन्याच्या दुसऱ्या शनिवार-रविवारची मला सुट्टी असल्याने आज बाबांनी देखील रजा घेतली. सकाळी उठल्यावर गप्पांमध्ये दिवसाचे आराखडे होता होता एक महिना झाला  घरच्यांबरोबर बघायचा ठरवलेला "बालगंधर्व" सिनेमाला जायचं ठरलं. गरम मिसळ आणि दुपारच्या पडीनंतर ५.३० च्या खेळाची तिकीटे काढली. आम्ही बरेच आधी पोचल्यामुळे आमच्या गप्पांमधून पण लोकांच्या गप्पांकडे लक्ष जात होतं. अगदी " family movie" आहे हो, बघितलाच पाहिजे असे म्हणत बरेच तिथे जमले होते.

बाबा मुळात कलाप्रेमी असल्याने मी विषयाशी पूर्णपणे परिचित होते. इतके दिवस जेव्हा कधी विषय निघायचा तेव्हा बाबा भरभरून बोलायचे. त्यांना कुठे थांबवायचे का नाहीच असा प्रश्न आई आणि मला पडायचा. त्यांच्या डोळ्यात चमकणाऱ्या त्या कलाप्रेमाने त्या बोलण्याला अजून उठाव यायचा. घरातल्या ३०० हून अधिक संगीताच्या कॅसेट्स व त्याहून कित्येक अधिक पुस्तके वाचून जमलेला तो ठेवा मला ते देऊ पाहतात. खोलवर अभ्यास नसला तरी चालेल पण अंगातलं रसिकत्व जप असं नेहमीच ते सांगत आले. रक्ताने जोडलेले आम्ही, ही शिकवण मुरायला जास्त वेळ लागला नाही. थोडेफार गाता व synthesizer वाजवता येते पण त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा मानस राहिला तो राहिलाच.

आजच्या reality shows मध्ये उठलेला कलेचा बाजार बघता मनोमन चीड येते. पण संसार चालवायचा म्हणजे लागणारा पैसा मिळवण्याचे तो एकमेव पर्याय उरल्यासारखे वाटते. डोक्याला निर्मळ आनंद देण्यापेक्षा कलकलच जास्त होते. अशावेळी आपले संपूर्ण आयुष्य रसिकांसाठी वाहून घेणाऱ्या गंधर्वांची महानता कळते की आदर वाटतो नीट समजत नाही.  भामिनीचा खानदानीपणा जपण्यासाठी तडफडणाऱ्या त्या जिवाच्या गोष्टी ऐकताना व आज सिनेमात समोर बघताना ते कलेवरचे वेडे प्रेम बघून अंगावर काटा आला. त्या वेळचे पुणे, कोल्हापूर, तो रंगमंच जणू त्या पडद्याऐवजी उभा केला होता.

दोन तास नेत्रसुख आणि भावना यात गुरफटलेल्या अवस्थेतच आम्ही स्तब्ध होतो. थिएटर बाहेर पडता पडता लोकांच्या टिपण्या परत लक्ष वेधून घ्यायला लागल्या. "काय कॅमेरा वापरलाय हो, सुबोधने काय झकास काम केलंय, मध्यंतरानंतर जरा रडवेला होता, यंदा सगळे अवार्ड सुबोध नेणार नक्की." सिनेमाच्या शेवटच्या ओळी संपायच्या  आधीच बाहेर चालू लागणाऱ्या ठकांची चीड येत होती. आम्ही २०-३० जण अजून ते जुने फोटो बघत असताना देखील ह्यांची बडबड सुरूच. हा सिनेमा केवळ एक entertainment आहे ह्यासाठी किती लोक आले होते आणि किती खरंच गंधर्वांच्या आयुष्यनाट्यात सामील व्हायला आले होते कुणास ठाऊक. सिनेमाचा पूर्ण वेळ बाजूला वेफर्स खाणारी मुले व पुढे ऑफिसमधल्या गप्पा मारणाऱ्या त्या बापाला ओरडून सांगावेसे वाटले घरी जाऊन काय ते टाळ पिटा !

घरच्यांना असलेल्या ज्ञानामुळे व रसिकत्वामुळे ह्या चित्रपटाची खोली मला जाणवू शकली. लहानपणापासून ह्या गोष्टी कानावर पडल्याने हा ठेवा ५०% का होईना मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकते. सिनेमात केवळ एक व्यक्तिरेखा साकारून सुबोधवर नकळत कलेने कित्येक संस्कार रुजवले असतील. त्यावर तो आपले पुढचे जीवन सार्थकी लावेलाच यात शंका नाही. पण मनात विचार येतात. त्या वेफर्स खाणाऱ्या मुलाला काय कळला असेल हा चित्रपट? ऑफिसच्या गप्पात बुडालेल्या त्या आईवडलांना सिनेमाची खोलाई जाणवत नाही तर त्या पुढच्या पिढीला कुठून उमगणार. कलेचा होणारं ऱ्हास तो हाच का नकळत वाटून गेले. विद्या आणि कलेचे माहेरघर अजून किती दिवस हे जपू शकणार हा प्रश्न आहे.

घरच्यांमुळे रुजलेले रसिकत्व आज कुठे तरी सुन्न झाले. ज्या बालगंधर्वांच्या सिनेमाचा आज गाजावाजा चालला आहे त्यांचे पुण्यातले अर्धवट पडके घर अजूनही कसाबसा हा पावसाळा झेलू पाहते आहे याचे वाईट वाटते...

1 comment:

ओजस चौधरी said...

मला तरी गाण्यांमधले जास्त काही कळत नाही पण गंधर्वाची कलेबद्दल असलेली तळमळ बघून वेडा झालो होतो...."ते खरचं गंधर्व होते त्यांना आपले माणसांचे नियम लागू होऊच शकत नाही ...."
तुझ्या पोस्ट मधून पण ती आर्तता जाणवते...