Wednesday, March 23, 2011

एका रस्त्यावरचे आयुष्य


नेताजी सुभाष रस्ता हे माझ्या आयुष्यातलं एक सुरेख पर्व आहे. 'जे.जे. आर्किटेक्चर'ला असताना माझी admission इथल्या सरकारी होस्टेलला झाली. ४०,००० रुपये स्क्वे.फूट च्या जागेत ६ महिन्याला फक्त ४,००० रुपये देऊन राहायला मिळत असेल हे ऐकून कोणीही वेड्यात काढेल. अन् सुभाष रस्ता सांगितलं तर ... एक मिनिट.. मरीन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेस म्हणजे आपला मराठीत नेताजी सुभाष रस्ता..!!

मित्रहो .. जळफळाट झाला का जरा..??

नेकलेस च्या साधारण मध्यभागी आमचं होस्टेल.. हो.. हे मी आणि इथे राहणाऱ्या बऱ्याच मुलींच्या आयुश्यातलं एक गोड सत्य आहे. ५ मजली जुन्या मॉडर्न स्टाईलचं बांधकाम, समोर दररोज एका नवीन ठेवणीचा निसर्गाचा wallpaper, आकाशाची निळाई, समुद्राचं खारं वारं.. किनारा म्हणता नाही येणार पण त्याप्रमाणेच थोडीफार भासणारी चौपाटी. रात्री दिवांची माळ अन् सुसाट जाणाऱ्या गाड्या... बऱ्याच लोकांनी केलेल्या या वर्णनाला अजून मी तरी किती शब्द वाढवणार म्हणा.

पहिल्या वर्षाला असताना खूप उड्या मारत आम्ही सगळ्या मुली इथे आलो. तेव्हा बराच वेळ असायचा मग बऱ्याच वेळा संध्याकाळी आम्ही walk ला जायचो. रोजचा सूर्यास्त बघायचा, समोर बसून चकाट्या पिटायच्या की दिवस संपला.

दुपारी भर उन्हात हाल व्हायचे. बस थांबा सोडला तर सावलीला फक्त नारळाची झाडं. इथेच संपलंय सगळं. त्यामुळे taxiमधून उतरताना सिग्नल हिरवा होईपर्यंत उन्हाचा अगदी ताप यायचा. सिग्नल मोडणं इथे जरा जीवाला धोकाच. तरीही दीडशहाणे लोक असतातच. भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांच्या मधे येणं आम्हाला धजावायचं नाही. त्यामुळे ज्या दिवशी सिग्नल बंद किंवा खराब असेल तेव्हा बेक्कार कसरत व्हायची.

रविवार म्हटला की मरीन ड्राईव्हला जत्रेचं स्वरूप असतं. बड्या लोकांपासून सामान्यापर्यंत सर्वजण येथे दिसतात. फरक फक्त त्यांच्या पोशाख आणि गाड्यांमधे असतो. बड्या brand च्या कार आणि बाईक बघणं ज्यांचा छंद त्यांना तर पर्वणीच. रोज कितीही वेळ रहदारी कडे बघितलं तरी कसा वेळ जातो कळत नाही. होमसिक झालं की खिडकीबाहेर टक लावून बघत बसायची सवयच लागली. कैवल्यधाम मधे योगा करताना ताडासनाच्या वेळी क्षितिजावर मंद गतीने हलणाऱ्या cargo ships वर नजर खिळायची. आजची किती मोठी, कालची किती छोटी, एका वेळी किती पहिल्या, कोणती जोरात पुढे गेली, कोणती किती वेळ एकाच जागी आहे या चर्चा नंतर रंगायच्या. पुढे पाचव्या वर्षाला thesis topic चा प्रोजेक्ट मी जेव्हा automobile museum निवडला त्याचा पाया या रस्त्याने आधीच घालून ठेवला होतं जणू.

पावसाळा आला की समुद्राचे ते उधाण रूप बघायला मजा यायची. आकाशाप्रमाणे रंग बदलणारं पाणी, सुसाट वारा की आपणच उडून जाऊ आणि भरतीला tetrablock वर फुटणाऱ्या उंच लाटा. ही लाट जेव्हा ४.५ मीटर पेक्षा उंच येणार असं हवामान खाते सांगते तेव्हा तर तांडवच. पण तेच ओहोटीला दुरवर पसरलेला कचरा बघून वाईट वाटायचं. दिवसातून दोन वेळा ओहोटी असा संपूर्ण पावसाळा महापालिकेचे कर्मचारी रस्ता साफ ठेवायचे. थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या.  मार्ग नाही पण ते त्याला कधीच नाही म्हणत नाही.

मुंबईचा पाऊस आला तर मुसळधार, नाहीतर एक थेंब नाही. तुरळक सरी नावाचा प्रकार नाही. त्यात भरतीची वेळ असेल तर सोसाट्याचा वारा.. छत्री शक्यतो न उघडलेलीच बरी. संपूर्ण काडीची तरी ठीक पण फोल्डिंग ची असेल तर garantee फक्त ५ मिनिटाचीच आणि तुम्ही चिंब भिजणार हे नक्की. तरीही हौसेने भिजायला येणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. पावसाचा आवाज आल्या आल्या होस्टेलच्या खिडक्या बंद करणे म्हणजे roadies पेक्षा अवघड टास्क. जुन्या लाकडी खिडक्या वाऱ्यामुळे आत ओढताना हालत खराब व्हायची. तोपर्यंत पाणी आत आलेले असणार. वर कष्टाने बंद करण्यात सफल झालो तरीही waterproofing वरचा भरवसा कधीच उठला होता. (सरकारी काम शेवटी) कॉलेज मधून आल्यावर ओले कपडे वाळवणे, पाण्यापासून laptop आणि submissions वाचवणे यासाठी इस्त्री आणि पंखाच मदतीला धावायचा. उन्हाळ्यात पण एवढं विजबील येत नसेल तेवढं पावसाळ्यात येत असेल आमच्या होस्टेलचं.. :) पण याचा वैताग कधीच नाही आला.

एरवी mobile वर पर्सनल गप्पा असतील तर आमची बाल्कनी आम्हाला फार प्रिय. रात्री- अपरात्री बऱ्याच वेळा आम्ही बाल्कनीत उभे राहायचो. थोडा ट्राफिक चा जोर कमी असायचा. या वेळी शांतपणे लाटांचा आवाज ऐकत आमच्या बाकड्यावर आम्ही सांडायचो. submissions च्या वेळी मधेच विरंगुळा म्हणून आपापल्या रूम सोडून आम्ही शांतपणे बाल्कनीत गप्पा मारायचो. रात्री टवाळक्या करणारी पोरं मोठ्याने बळच "पूजा" नावाने ओरडायची. उगाच.. अंगात मस्ती...

गणपतीची मिरवणूक बघायला आमची टेरेसवर वर गर्दी व्हायची. दुरवर अडकलेलं ट्राफिक, वाजतगाजत नेणारे गणपती, हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या पाण्यावर आलेली वलय आणि एका वेगळ्याच जोशाने सजलेले मुंबईकर, vintage car rally याची देही याची डोळा अन् ते पण घर बसल्या, मंत्र्यांच्या भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा ताफा अन् शुटींग च्या भोवती माणसांचा घोळका असे कितीतरी क्षण.
 
वर्षातला एकाच दिवस असतो जेव्हा इथे "pindrop silence" असतो. तो दिवस म्हणजे marathon चा दिवस. या दिवशी ट्राफिक दुसऱ्या दिशेला वळवले असते. जिमखाना मैदानावर बऱ्याच वेळा मोठ्या घरातले लग्न समारंभ होतात. त्यांची नयनरम्य आतिषबाजी अगदी फुकट बघायला मिळते. वानखेडे, ब्रेबॉर्नला कधी क्रिकेटचा सामना असेल तर मग विचारायलाच नको. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत (आणि त्यांची कुत्री सुद्धा) येथे वेळ दवडायला पुढे मागे पाहत नाहीत.

मधेच एखादा करकचून ब्रेक दाबायचा आवाज आला की काळजाचा ठोका चुकायचा. उघड्या डोळ्याने पाहिलेले ओबेरॉय चे स्फोट व चौपाटीवरच्या encounter नंतर दारूगोळ्याच्या वासाने आजही अंगावर शिरशिरी येते. एरवी दिमाखाने उभे असणारे ओबेरॉय होटेल त्या रात्री काळोखात गुडूप झाले होते. ४ दिवस होस्टेल ला दबकूनच होते सगळे. सर्व न्यूज, वर्तमानपत्र वाचून, मोबाईल वर शेकडो काळ्जीस्वरांना उत्तरं देता देता धीर संपत होता. दुसऱ्या दिवशी चील मधे जॉगिंग करताना मुंबईकरांनी एक वेगळाच धडा आम्हाला शिकवला.

उत्सव, rally, सर्व ऋतू, accidents अशा कितीतरी गोष्टी सामावून घेऊन या मरीन ड्राईव्हने तिथला ऐकन् एक क्षण एखाद्या स्वप्नाप्रमाणे फुलवलाय अन् बरेच काही शिकवलेय.. कदाचित आत्ताचे काही क्षण माझ्या कॅमेरातून आणि पोस्ट वाचून तुम्हाला सुद्धा ते अनुभवता आले असतील...!!

9 comments:

Unknown said...

awesome one ! jaaam avadlai post ! akkha jamlai !

Rohit said...

The post somehow gives me a nice feeling about the couple of years I am about to spend in Mumbai..
Hope I get as lucky as you did :)
And keep it up with the blog. Looking forward to more posts :)

ओजस चौधरी said...

तुझ्या फोटोने पोस्ट मध्ये एक जान आणली आहे....मला तू अनुभवलेले सगळे दिवस डोळ्यासमोर दिसले...

Prasad said...

मस्त ब्लॉग आहे.
सगळेच लेख आवडले.
असेच लिहीत राहा.

Unknown said...

sayleee awesome post....
loved ur writing...
n i knw hw much u must b missing it...
even v gonna miss it after a yr...:(

Ashish Sawant said...

सोलिड यार !!
यु आर सो लकी !!! मुंबईतला माझा सर्वात आवडता स्पॉट आहे. आणि त्याचे नाव सुभाष रस्ता आहे ते माहीतच नव्हते. आम्ही आपला क्वीन्स नेकलेसचा म्हणत आलो. आता मित्रांना सांगेल सुभाष रस्ता बोलायला.
खरच खूप छान नजरा दिसत असेल ना दररोज !! पावसाळ्यात तर खूपच सुंदर वातावरण असेल.
रिअली यु आर सो लकी

saanasi said...

नशिबाने मुंबईतील अशाच एका अप्रतिम सुंदर ठिकाणी मी दोन वर्षे रहात होते.
मुंबईचे शेवटचे टोक म्हणता येईल असे ,कुलाब्यातील आर.सी. चर्चच्या पुढे असणार्‍या नौदल अधिकार्‍यांसाठी असलेल्या एका इमारतीत.
सहाव्या मजल्यावरच्या फ्लॅट ची मास्टर बेडरूम सी फेसिंग होती........!
माझा नवरा तेव्हा आय.एन.एस. विराट वर होता. बोट निघालेली मला खिडकीतून दिसायची..

Tanmay said...

There is truly something special about your writing... I could not figure out what... May be the beauty of your writings lies in the honesty of the content and emotions... Of course your writing style is too good.. the flow is superb... but what impresses me more is the purity of the content...

BinaryBandya™ said...

फोटो आणि पोस्ट दोन्हीही मस्त ..